तुमचे विचार तुमच्या भावनांना प्रभावित करतात, तुमच्या भावना तुमच्या निर्णयांना प्रभावित करतात आणि तुमचे निर्णय तुमचं आयुष्य प्रभावित करतात.

आपल्या आयुष्यात अनेक प्रकारच्या घटना घडत असतात आणि आपण त्या घटनांना वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत असतो. खरं तर आपल्याला वाटत असतं की आपला हा प्रतिसाद त्या घटनेमुळेच निर्माण होतो. पण मानसशास्त्रात असे सांगितले जाते की हे फक्त क्रिया —> प्रतिसाद एवढेच समीकरण नसते तर त्यामध्ये आपले विचार, भावना आणि वर्तन ह्या त्रिकूटाचा सहभाग असतो. एखादी घटना घडली की आपल्या मनात अनेक विचारांचे चक्र सुरू होते. ह्या विचारांनुरूप काही भावना पण निर्माण होतात आणि ह्या दोन्हींच्या प्रभावाखाली आपल्याकडून विशिष्ठ प्रकारचे वर्तन घडते. कधी घटनेला अनुसरून पहिले भावना निर्माण होते आणि मग विचार आणि वर्तन घडते तर काही वेळेला घटना घडल्यावर आधी आपले वर्तन होते आणि मग विचार आणि भावना समोर येतात. हे तिन्ही घटक कसे काम करतात हे समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊ.

यासाठी आपण ४ व्यक्ती (अ, ब, क, आणि ड ) विचारात घेऊ. समजा, या चौघांवरही त्यांचा बॉस त्यांनी वेळेत पूर्ण न केलेल्या एखाद्या कामाबद्दल चिडला आहे. आता जर घडलेली घटना हाच येणाऱ्या प्रतिसादाचा एकमेव निकष असेल तर या घटनेला ह्या चौघांचाही एकच प्रतिसाद यायला हवा. परंतु प्रत्यक्षात पहिले तर एका घटनेचा एकच प्रतिसाद मिळणं तसं अवघडच असतं. म्हणजे कदाचित व्यक्ति अ चिडेल (स्वगत : “ह्या बॉसचं काय जातंय चिडायला, एकामागोमाग एवढी कामं असतात, एखादं काम नाही झालं वेळेत पूर्ण तर एवढं काय त्यात, मी काय रिकामा बसलो होतो, बॉस आहे म्हणून वाटेल ते बोलायचं का?” भावना: राग, वर्तन: ऑफिसमध्ये किंवा घरात इतरांवर चिडचिड करणे, रागात काम पूर्ण करणे.) व्यक्ति ब निराश होईल (स्वगत : “काय फायदा इथे एवढी मरमर करून कितीही काम करा तरीही काहीतरी राहूनच जातं, सतत सगळ्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कष्ट करायचे आणि कौतुक तर कोणीच करत नाही.” भावना: नैराश्य, वर्तन: दुःखी मनाने काम करायला घेणे, स्वतःला किंवा नशिबाला बोल लावत बसणे.) कदाचित व्यक्ति क घाबरेल (स्वगत : बापरे, आज पुन्हा बॉस माझ्यावर चिडला आहे. आता काय करू, अशाच चुका होत राहिल्या माझ्या तर नक्कीच माझ्या एकंदर कामगिरीवर परिणाम होईल, पगार वाढणार नाही किंवा नौकरी गेली तर..”, भावना: भीती, वर्तन: भीतीने अस्वस्थ होऊन आत्मविश्वास घालविणे, कामात चुका करणे). व्यक्ति ड बॉसच्या बोलण्याला स्वतःचे मूल्यमापन न समजता कामाविषयीचा अभिप्राय (feedback) स्वरूपात ठेवून त्यावर योग्य ती कृती करेल (स्वगत: माझे काम वेळेवर पूर्ण झाले नाही हे मान्य पण तरीही बॉसनी माझ्यावर इतके चिडायला नको होते, मला नक्कीच त्यांचे वागणे आवडले नाही पण हे काम पूर्ण करून देण्यासाठी त्यांच्यावर कदाचित त्यांच्या वरिष्ठांचा दबाव असेल आणि त्यामुळे ते चिडले असावेत. मी लवकरात लवकर माझ्याकडून हे काम पूर्ण करून देण्याचा प्रयत्न करेन, भावना: विरस/हिरमोड , वर्तन: स्वतःचा झालेला हिरमोड बाजूला ठेवून काम व्यवस्थित पूर्ण करणे.)

वरील उदाहरणातून तुमच्या हे लक्षात आलं असेल की जरी घडलेली घटना एकच असली तरी त्या घटनेवर केलेल्या विचारांमुळे प्रत्येकाची भावना आणि वर्तन बदलते. म्हणजे अ, ब आणि क यांच्या भावनांची तीव्रता जास्त आहे तर ड व्यक्तीला जरी ही परिस्थिति फारशी पटली नसली तरीही त्याच्या भावनांची तीव्रता त्यामानाने कमी असल्यामुळे त्याचे वर्तन संतुलित होते. म्हणूनच जर आपण स्वतःला आपल्या विचारांचे मूल्यमापन करायची सवय लाऊन घेतली तर आपल्याला आपल्या भावना आणि वर्तन यांचा सुयोग्य समतोल साधता येऊ शकतो. म्हणजे कोणत्याही कठीण परिस्थितीत आपल्याला आपल्या त्रासदायक भावनांची तीव्रता कमी करून कृतिशील राहणे शक्य होईल. चला तर मग, विचार-भावना आणि वर्तनाच्या या त्रिकूटाशी मैत्री करूया का??

जेव्हा आपण आपल्या भावनांबद्दल जागरूक होतो, तेव्हा आपण एक वेगळीच शक्ति अनुभवत असतो.


Leave a comment