
“तुमच्या भावना नक्कीच अनुभवा, पण त्यांना तुमच्या कृतीवर अधिकार गाजवू देवू नका!!”
मागच्या लेखात आपण भावना म्हणजे काय आणि त्या ओळखायच्या कशा याबद्दल जाणून घेतले. आता आपण भावनिक बुद्धिमत्ता (emotional intelligence) या महत्वाच्या विषयाबद्दल जाणून घेऊया. खरंतर आत्तापर्यंत आपण बुद्धिमत्तेबद्दल खूप काही ऐकलं आहे. थोडक्यात सांगायचं तर अनेक गोष्टी शिकणे, नवीन परिस्थितीशी जुळवून घेणे, योग्य विचार करून निर्णय घेणे तसेच विविध प्रकारच्या समस्या सोडवणे या सगळ्या गोष्टींसाठी लागणारी मानसिक क्षमता म्हणजेच बुद्धिमत्ता (intelligence) होय आणि ह्या बुद्धिमत्तेचे मापक म्हणजे बुद्ध्यांक (Intelligence quotient, IQ). अनेक वर्षं बुद्धिमत्ता ही केवळ काही पैलूंवर मोजल्या जात होती ज्यात प्रामुख्याने शाब्दिक आणि संख्यात्मक क्षमतांची काही चाचण्यांद्वारे मोजमाप करून बुद्ध्यांक काढला जात असे. हॉवर्ड गार्डनर यांनी त्यांच्या बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांतात असे ठामपणे मत मांडले की, बुद्धिमत्ते चे नऊ स्वतंत्र प्रकार असतात जसे की (१) भाषिक बुद्धिमत्ता, (२) तार्किक-गणितीय बुद्धिमत्ता, (३)अवकाशीय बुद्धिमत्ता, (४) संगीतीय बुद्धिमत्ता, (५) शरीरगतीविषयक बुद्धिमत्ता, (६)आंतरव्यक्तिक बुद्धिमत्ता,(७) व्यक्तिअंतर्गत बुद्धिमत्ता, (८) निसर्गात्मक बुद्धिमत्ता आणि (९) अस्तित्वात्मक बुद्धिमत्ता. ह्या संशोधनानंतर बुद्धिमत्तेची संकल्पना काही अंशी व्यापक झाली.
जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही या मानसशास्त्रज्ञांनी ‘भावनिक बुद्धिमत्ता ’ या संज्ञेचा सर्व प्रथम वापर केला.
डॅनियल गोलमन (१९९५) यांनी भावनिक बुद्धिमत्ता या संकल्पनेस जनमानसात प्रसिद्धी दिली. जॉन मेयर आणि पीटर सॅलोव्ही यांच्या मते, “स्वतःच्या व इतरांच्या भावनांच्या आकलनाची व त्यांच्या व्यवस्थापनाची क्षमता, भावनांमधील फरक जाणून घेण्याची क्षमता आणि या माहितीच्या आधारे स्वतःच्या विचारांना आणि वर्तनांना दिशा देण्याची क्षमता यालाच भावनिक बुद्धिमत्ता म्हणतात.” डॅनियल गोलमन यांनी तर भावनिक बुद्धिमत्तेला पारंपरिक बुद्धिमत्तेपेक्षा जास्त उपयुक्त आणि गरजेचे ठरवले आहे.
तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ बुध्यांक जास्त असून चालत नाही कारण त्याच्या भरवशावर आपण शिक्षण किंवा करियर मध्ये एका विशिष्ठ जागेपर्यंत नक्की पोचू शकू पण तिथे टिकणे आणि तिथून पुढे वाटचाल करणे यासाठी भावनिक बुद्धिमत्ताच गरजेची आहे. आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनात परस्पर नातेसंबंध महत्वाची भूमिका बजावतात, मग त्या कुटुंबातील व्यक्ति असो, परिचित असो किंवा सोबत काम करणारे सहकारी असो. या सगळयांसोबत योग्य असे संबंध टिकवता आले तरच आपल्या आयुष्यातील या दोन्ही आघाड्या आपल्याला नीट सांभाळता येतात. म्हणूनच आपला भावनांक वाढवण्यावर जास्त भर दिला गेला पाहिजे.
आता ही भावनिक बुद्धिमत्ता कशी विकसित करायची हे पाहूया. त्यासाठी पहिली पायरी म्हणजे स्वतःची जाणीव (self-awareness). जेव्हा आपण जाणीवपूर्वक स्वतःकडे बघतो तेव्हा आपल्याला कळते की आपल्याला नेमकं काय वाटतं आहे, आजूबाजूचे लोक, परिस्थिती यांचा आपल्या भावविश्वावर काय परिणाम होतो आहे किंवा आपण कोणत्या भावना अनुभवत आहोत. हे निरीक्षण केले तर आपल्याला आपल्या वागण्यामागचे नेमके कारण कळेल आणि गरजेनुसार आपण आपल्या वागण्यात योग्य तो बदल करू शकू. या पुढची पायरी म्हणजे स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन (self-regulation). एखाद्या उत्तेजित करणाऱ्या व्यक्तीला किंवा प्रसंगाला तात्काळ आणि तीव्र स्वरूपाची भावनिक प्रतिक्रिया देणे ही माणसाची सहज प्रवृत्ती असते. पण ज्यांना स्वतःच्या भावनांची नीट ओळख असेल ते ही उर्मी बऱ्याच अंशी थोपवू शकतात म्हणजे एखाद्या घटनेवर तात्काळ प्रतिक्रिया देणे किंवा भावनेच्या भरात चुकीचे निर्णय घेणे यासारख्या गोष्टी थोडा अवकाश घेऊन, परिणामांचा शांतपणे विचार करून थांबवता येऊ शकतात यालाच स्वतःच्या भावनांचे व्यवस्थापन म्हणता येईल.
त्यानंतर येते ती सहवेदना/तदनुभूती (empathy) म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून (put yourself in someone’s shoes) त्यांच्या भावना, वेदना आणि दृष्टिकोन समजून घेणे. जेव्हा एखादी व्यक्ती चिडलेली असते किंवा दुःखी/निराश असते, तेव्हा स्वतःला तिच्या जागी ठेऊन तिला तसे का वाटते आहे हे समजावून घेणे ही परस्पर संबंध दृढ करण्याची महत्वाची पायरी आहे. कोणतीही प्रतिक्रिया न देता त्या व्यक्तीचे बोलणे शांतपणे ऐकून घेणे ही सहवेदना जोपासण्याची सुरवात असू शकते.
स्वयं-प्रेरणा (self-motivation) म्हणजे पैसा, पद, प्रतिष्ठा यासारख्या गोष्टीच्या अति मागे न लागता स्वतःचे काम, प्रगती आणि समाधान या गोष्टींमध्ये प्रेरणा शोधणे कारण अंतर्गत प्रेरक आपल्याला पुढे जाण्यास मदत करतात, अपयश आले तरी त्यातून बाहेर पडून योग्य मार्गावर आणतात.
भावनिक बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी शेवटचा पण महत्वाचा घटक आहे सामाजिक कौशल्ये (social skills). आपल्या वैयक्तिक तसेच सामाजिक परिघातील लोकांशी प्रभावी पद्धतीने संवाद साधण्याने ही परस्पर संबंध दृढ होतात. आपले म्हणणे समोरच्या व्यक्तिपर्यंत व्यवस्थित पोचवता येणे, समोरच्याची बाजू समजून घेणे, वादाच्या/ मतभेदाच्या वेळी सामंजस्याची भूमिका घेता येणे ही काही महत्वाची सामाजिक कौशल्ये आहेत.
या पाच पातळ्यांवर स्वतःवर सातत्याने काम करत राहणे म्हणजेच भावनिकदृष्ट्या बुद्धिमान होणे होय. आताचे जग हे फक्त आपण दिलेल्या परीक्षा, त्यात मिळालेले मार्क्स आणि त्या आधारे मिळवलेल्या पदव्या यातून बुद्धिमत्ता सिद्ध करण्याचे नाही तर आपले वैयक्तिक आयुष्य, कामाचे ठिकाण आणि समाजात वावरणाऱ्या विविध व्यक्तींशी योग्य प्रकारे व्यवहार करता येणे आणि त्यासोबत आयुष्यात येणाऱ्या उतार-चढावांचा समर्थपणे सामना करता येणे यासाठी लागणाऱ्या भावनिक बुद्धिमत्तेचे आहे हे नक्की!!
“लक्षात ठेवा.. सगळ्या भावना ग्राह्य आहेत पण, सगळेच वर्तन ग्राह्य नसते!!”
