तुमच्या भावना सांभाळण्यापेक्षा त्या भावनांवरची तुमची प्रतिक्रिया सांभाळणं जास्त गरजेचं असतं!!

समस्त सजीव प्राण्यांमध्ये माणूस विशेष ठरतो कारण त्याला बुद्धी आणि वाणीचं वरदान मिळालं आहे. याशिवाय आपल्याजवळ भावना नावाचं एक अद्भुत साधन देखील आहे, ज्यामुळे आपल्या जीवनाला वेगळा अर्थ प्राप्त होतो. तर नेमक्या काय असतात या भावना आणि भावनांबद्दल जाणून घेण्याची काय गरज आहे? म्हणजे कधी आपल्याला खूप आनंद होतो, तर कधी भीती वाटते किंवा कधी राग येतो तर कधी उदास वाटतं, हे तर सगळ्यांसोबत होतं, मग त्याबद्दल माहिती घेतली तर आपल्याच भावनांचा अर्थ आपल्याला नव्याने उमगेल आणि आपण अधिक जागरुक राहू, आपले नातेसंबंध आणि त्यातुन निर्माण होणाऱ्या ताणाचे आपल्याला योग्यप्रकारे नियमन करता येईल, आपली निर्णय क्षमता वाढेल आणि एकूणच मानसिक स्वास्थ्य सुधारण्यास मदत होईल.

तर भावनेची थोडक्यात पण शास्त्रशुद्ध व्याख्या सांगायची झाली तर भावना म्हणजे शारीरिक उत्तेजना (bodily arousal), प्रतिसादात्मक कृती (expressive behavior), आणि विचार (thoughts) या सर्वांची एकत्रित युती होय. जसे रात्री, सुनसान, निर्मनुष्य रस्त्यावर एकटेच चालत जात असताना अचानक एखादा आवाज ऐकू आला तर छातीत वाढलेली धडधड आणि पावलांची वाढलेली गती, आपल्या मागावर कोणी असेल का किंवा काही संकट आलंच तर कोणाची मदत घेता येईल का हे असे अनेक विचार हे सगळं एकत्रितपणे घडत असतं. याचाच अर्थ असा की आपल्या मनात भीती ही भावना उत्पन्न झाली आहे. हे सगळंच इतक्या निमिषार्धात घडतं की या सगळ्या घटनांचा अर्थ लावण्याचे भान आपल्याला राहत नाही आणि खरं तर तिथे त्या क्षणी भीती वाटणे हे आपल्या सुरक्षित राहण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण ठरणार असतं. कारण या भीतीतूनच आपल्या बचावा साठीची कृती (पळणे, लपणे) आपल्याकडून घडणार असते. म्हणजेच खरंतर भावना एखाद्या प्रासंगिक उत्तेजनाला शरीराने दिलेली प्रतिक्रिया असते त्यामुळे भावना नियंत्रित करणे हा मामला जरा कठीणच आहे.

त्यामुळे भावना समजून घेणे हे आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप गरजेचे आहे. याविषयी आतापर्यंत अनेक प्रकारचे अभ्यास झाले आहेत. अमेरिकन मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट प्लुटचिक यांनी “भावनांचे चक्र” विकसित केले ज्याद्वारे त्यांनी विविध भावनांमधील संबंध चित्रित केले आहेत. त्‍यांच्या या चक्रात आठ प्रकारच्या प्राथमिक भावना सांगितल्‍या आहेत . आनंद, विश्वास, भीती, आश्चर्य , दुःख, अपेक्षा, क्रोध/राग, आणि तिरस्‍कार. प्रत्‍येक प्राथमिक भावनेला विरूध्द भावना आहे. उदा. आनंद ही भावना दुःख भावनेच्या विरूध्द आहे. भीती ही राग भावनेच्या विरूध्द आहे.

त्याशिवाय या चक्राच्या केंद्रापासून बाहेरच्या दिशेने गेल्‍यास भावनांची तीव्रता कमी होत जाते आणि केंद्राच्या दिशेने गेल्‍यास त्यांची तीव्रता वाढतांना दिसते . रंग भावनेची तीव्रता दर्शवितात . जितका रंग गडद तितकी भावना तीव्र. उदा. जास्त तीव्रतेचा राग म्हणजे संताप तर कमी तीव्रतेचा राग म्हणजे चिडचिड किंवा त्रस्तता. तसेच दोन भावनांच्या संयोगातुन तिसरी भावना निर्माण होऊ शकते जसे की आनंद आणि विश्वास यांच्या मिश्रणातून प्रेम ही भावना निर्माण होते.

अशाप्रकारे, प्लुटचिक यांच्या भावनिक चक्राच्या मदतीने आपण भावनिकदृष्ट्या साक्षर होऊ शकतो ज्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या शब्दांची माहिती तर होईलच पण त्याशिवाय त्या भावनांचा परस्परांशी कसा संबंध असतो आणि भावनांत कालांतराने कसा बदल होतो हे सुद्धा जाणून घेता येईल.

चला तर मग, आपल्या भावनांचा अभ्यास या भावना चक्राच्या मदतीने करून पाहूया. मग पुढच्या लेखात भावनिक बुद्धिमत्ता म्हणजे काय आणि ती कशी वाढवता येते हे जाणून घेऊया. याविषयी अजून काय वाचायला आवडेल हे ही कमेन्टमध्ये नक्की कळवा.

जेव्हा तुम्ही आपल्या भावनांविषयी जागरूक होता, तेव्हा तुम्ही खऱ्या अर्थाने सक्षम होता!!!


Leave a comment