आनंद हा एक प्रवास आहे, गंतव्यस्थान (लक्ष्य) नाही!!
आपल्याला सगळ्यांनाच आनंदी राहायचं असतं आणि म्हणून आपण सतत आनंद शोधत असतो. कधी कधी आपल्याला आपला आनंद सापडतो देखील पण बरेचदा हा खूप कमी वेळ टिकतो आणि मग पुन्हा आपण त्याच आनंदाच्या शोधात अस्वस्थ राहतो. खरं तर आनंद हा खूप व्यक्तीसापेक्ष अनुभव आहे, म्हणजे नेमका कशातून आनंद मिळतो हे व्यक्तिनुरूप बदलत जातं. त्यामुळे प्रत्येकाला आपल्याला कशातून आनंद मिळतो हे पक्कं लक्षात आलं की त्याला त्याच्या आनंदाचा मार्ग शोधता येतो. पण खूप वेळा आपण समाजाने ठरवलेल्या किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे बघून आपल्या आनंदाची व्याख्या ठरवतो आणि मग बाकीचे लोक कसे आनंदात आहे आणि आपण मात्र कसे दुःखी ह्या विवंचनेत असतो.
तर नेमका आनंद कसा आणि कुठे शोधावा यावर तर बरंच लिहिता येईल पण आज मला आपल्या आनंदात बाधा ठरणाऱ्या काही गोष्टींबद्दल लिहायचं आहे. आणि गंमत म्हणजे ह्या गोष्टी बरेचदा सगळ्यांच्या बाबतीत सारख्याच असतात.
१. सतत भूतकाळात राहणे/ घडून गेलेल्या घटनांबद्दल खेद व्यक्त करणे: आपल्यापैकी बरेच लोक या चक्रात अडकतात. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात काही न काही अप्रिय घटना घडून गेल्या असतात. जसे की एखादी उत्तम संधी हातातून निसटणे, महत्वाच्या कामात अपयश येणे, कुठल्यातरी नात्यात दुरावा येणे या किंवा अश्या अनेक घटना घडलेल्या असतात, ज्यांचे परिणाम आपण अगदी आपल्या वर्तमान आयुष्यातदेखील भोगत असतो. पण तरीही या घटनांची सतत उजळणी करत राहणे, त्याबद्दल खेद व्यक्त करत राहणे किंवा त्याबद्दल स्वतःला, इतरांना किंवा नशिबाला दोष देत राहणे हे आपल्या आनंदात मोठा अडसर ठरते. आपण कितीही त्रागा किंवा खंत केली तरी सत्य हेच आहे की भूतकाळ बदलता येत नाही. घडून गेलेल्या घटनांकडे पाहण्याचा दृष्टिकोण बदलणे एवढा एकच बदल आपण त्यात करू शकतो. म्हणून भूतकाळातून बाहेर पडणे हेच आनंदाकडे जाण्याचं पहिलं पाऊल आहे, असं मला वाटतं.
२. सारखी भविष्याची चिंता करणे: असं बरेचदा म्हटलं जातं की, माणसाचा एक पाय भूतकाळात तर दूसरा पाय भविष्यात असतो आणि म्हणून त्याला वर्तमानात समतोल साधणं जमत नाही. ते खरंच नाही का? म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे आपण एकतर काल काय घडले हे उगाळत असतो किंवा उद्या काय घडेल याच्या काळजीत असतो. तसं पाहिलं तर अगदी ८०% वेळा भविष्यात घडू शकणाऱ्या नकारात्मक शक्यता जणू तश्याच्या तशा प्रत्यक्षात येणार आहेत अशा आविर्भावात आपण चिंता करत असतो. एक विचारवंत मिष्किलपणे म्हणतो, माझे आयुष्य अश्या आपत्तींनी भरले आहे ज्या कधी घडल्याच नाहीत. मग कधीतरी घडू शकणाऱ्या आणि आपल्या नियंत्रणाच्या पूर्णपणे बाहेर असणाऱ्या घटनांची (की दुर्घटनांची??) काळजी करण्यात आपला आजचा वेळ का खराब करायचा? त्यापेक्षा तो वेळ आता आनंद शोधण्यात सत्कारणी लाऊया, नाही का??
३. आपल्या आनंदाचे उत्तरदायित्व दुसऱ्यावर टाकणे/व्यक्ति किंवा वस्तूत आनंद शोधणे: आपण बरेचदा आपल्या आनंदाचं रिमोट दुसऱ्यांच्या हातात दिलेलं असतं, कधी नकळत तर कधी अगदी हेतुपूरस्तर!! म्हणजे जर समोरची व्यक्ति माझ्या मनासारखी वागली तर मी आनंदी होईन आणि ती माझ्या मनाविरुद्ध वागली तर मी दुःखी!! जसं, “मी माझ्या मुलासाठी एवढं करते, तर त्याने चांगला अभ्यास करावा, बस्स.. यातच माझा आनंद आहे!!” हे असं म्हटलं की आपण आपल्या मुलावर आपल्याला आनंदी करण्याचं ओझं लादतो, आणि त्याने तसं केलं नाही तर त्याला दोष सुद्धा देतो!! आणि हे फक्त एकाच नात्यात नसतं तर आपल्या जवळच्या प्रत्येक नात्याकडून आपण ही अपेक्षा ठेवतो. मग कोणीतरी एखादं जरी आपल्याला हवं तसं वागलं नाही, तर आपण हिरमुसून जातो. आता तुम्ही म्हणाल मग कोणाकडून काही अपेक्षाच ठेवायच्या नाहीत का?? आम्ही काय संत थोडेच आहोत, आणि आमच्या अपेक्षा काही स्वार्थी नाहीत, त्यात समोरच्याचं चांगलं झालं पाहिजे हीच इच्छा आहे!! सगळं मान्य… पण अपेक्षा करणं आणि त्या पूर्ण होण्याचा अट्टहास धरणं यात फरक आहे ना.. आणि त्यावर आपला आनंद, आपली मनःशांती अवलंबून ठेवणे इथे खरा घोळ होतो. चिरकाल टिकणारा, खरा आणि निखळ आनंद फक्त आपण स्वतःच निर्माण करू शकतो हे बऱ्याच संशोधनाअंती सिद्ध झालं आहे.
४. तुलना: तर हा सगळ्यांना माहीत असलेला पण तरीही दुर्लक्षीला जाणारा मुद्दा. हे आपण नेहमीच ऐकत आलो आहोत की दुसऱ्यांशी कोणत्याही बाबतीत केलेली तुलना की आपल्या दुःखाचे मूळ ठरते, आणि ते तंतोतंत खरेच आहे. म्हणजे त्यांचं घर किती मोठं आहे, ते सुट्टीत कुठे फिरायला गेले पासून तिचा नवरा तिच्यावर किती प्रेम करतो आणि त्याचा मुलगा किती छान कंपनीत नोकरीला आहे, अशा अनेक गोष्टी बघून आपल्याकडे काय आणि किती कमी आहे ह्याची मोजमाप आपण नकळत करत असतो, नाही का? आजच्या सोशल मीडियाच्या जगात तर या तुलनेत अधिक भर पडली आहे. तर ओळखीच्या किंवा अनोळखी लोकांसोबत तुलना करून तुम्ही तुमचा आनंद हरवत नाही आहात ना हे एकदा नक्की तपासून पहा.
आपण सतत आनंदी राहू शकत नाही हे जरी खरं असलं तरी जर आपल्या आनंदाची जबाबदारी स्वतःवर घेतली तर आपल्या आनंदाचा आपल्याला खऱ्या अर्थाने शोध घेत येईल. काय मग करणार का प्रयत्न??
आयुष्यात अनेक दुःख, संकटं येतात, पण आनंदी राहणे हा एक पर्याय असतो आणि तो तुम्ही तुमच्यासाठी नक्की निवडू शकता!!
