सरसकट लेबल..!!

Published on

in

"समजून घेण्यापेक्षा लेबल लावणे नेहमीच सोपे असते."

शीर्षक वाचून गडबडलात ना?? म्हणजे ही काय इंग्रजी-मराठी ची खिचडी असं नक्कीच वाटलं असेल. पण इथे लेबल हा शब्द खरंच मी इंग्रजी अर्थानेच वापरला आहे. म्हणजे शाळेत असताना कसं आपण नवीन पुस्तक-वह्यांना कवर घालून त्यावर आपले नाव, वर्ग इत्यादि माहिती असणारे लेबल लावत असू, तसंच आजकाल आपण आपल्या आजूबाजूच्या माणसांवर लेबल लावू लागलो आहोत. म्हणजे एखादं लहान मूल कशासाठी तरी हट्ट करत असेल तर आपण आजकालची लहान मुलं किती हट्टी झाली आहेत असं म्हणून मोकळे होतो. किंवा करियर आणि घर याचा तोल सांभाळत जर स्त्रिया बाहेर पडून त्यांचे छंद किंवा आवडी जपत असतील तर त्यांना अतिशहाण्या किंवा अगदी स्वार्थी/बेजबाबदार अशी लेबल दिली जातात. घरात स्वेच्छेने किंवा गरजेपोटी राहणारी एखादी गृहिणी असेल तर तिला आळशी/गौण म्हटले जाते. बॉस म्हणजे बरेचदा रागीट/चिडका असंच समीकरण असतं पण जर कधी त्याने एखाद्या कर्मचाऱ्याच्या अडचणी समजून घेऊन त्याची मदत केली तर तो पक्षपाती असं लेबल त्याला दिलं जातं.

हे लेबल नेमकं काय असतं आणि का देत असतो आपण ही अशी लेबल आपल्या आजूबाजूच्यांना? चला जाणून घेऊया. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला लेबल लावतो, तेव्हा खरं तर त्याचे पूर्ण व्यक्तिमत्व आपण एका शब्दात किंवा वाक्प्रचारात बंदिस्त करून टाकतो. आणि बहुतेक वेळा हे लेबल त्या व्यक्तीच्या एखाद्या वर्तन किंवा वैशिष्टयावर आधारित असते. तरीसुद्धा वर्तन आणि व्यक्ति यात भेद न करता व्यक्तीवरच शिक्का मारला जातो आणि इथेच न थांबता आपण सरसकट व्यक्तींच्या समूहालाच ते लेबल चिकटवतो. त्यासाठीच मी वर तसे शीर्षक दिले आहे. यात घोळ असा होतो की बरेचदा ती व्यक्ति त्या शिक्क्यालाच आपली ओळख समजायला लागते आणि मग तिचे वर्तनही त्याचप्रकारे होते. म्हणजे एखादा मुलगा काही कामं करण्याचा कंटाळा करत असेल तर त्याला “आळशी” हे लेबल दिलं जातं. मग त्या लेबलसोबत मोठं होत असताना त्याच्या मनामध्ये स्वतःची आळशी ही प्रतिमा तयार होऊ शकते आणि त्याला जमणाऱ्या किंवा आवडणाऱ्या गोष्टीमध्येसुद्धा रस घेण्याची इच्छा त्याला होणार नाही. तसेच एखाद्या व्यक्तीच्या एका स्वभाव वैशिष्टयाला दिलेल्या या लेबलचा वापर ती व्यक्ति ढाल म्हणूनदेखील करू शकते. जसं की, एखाद्या व्यक्तीला जर सारखं “चिडका” असं संबोधलं गेलं, तर स्वतःच्या रागाचं समर्थन करण्यासाठी ती व्यक्ति या लेबलचा वापर करू शकते म्हणजे स्वतःच्या रागावर काम करण्याऐवजी “आहेच मी चिडकी, तर मला राग येणारच” असं म्हणून स्वतःच्या रागाचं समर्थनच करू लागेल आणि ती गोष्ट सुधारण्याचा प्रयत्नसुद्धा करणार नाही.

बऱ्याच वेळी काही stereotypes (साचेबद्ध समज) जन्माला येण्यासाठी सुद्धा हे असे सरसकट लेबलच कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ, पुरुषांना स्वयंपाकात रस नसतो किंवा स्त्रियांना वाहने नीट चालवता येत नाहीत, हे इतके जनमानसात रुजलेले समज आहेत की यांना छेद देणारी कितीतरी उदाहरणे आपल्या समोर असली तरी ते अजूनही पूर्णपणे पुसल्या जात नाहीत. यामागे कित्येक पिढ्यांपासून दिले गेलेले लेबलच कारण आहेत. थोडा विचार केला की आपल्याही हे लक्षात येऊ शकतं की आपल्या लहानपणी आपल्याला दिलं गेलेलं एखादं लेबल आपल्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत किती महत्वाचं ठरतं. म्हणजे आपल्या स्व-प्रतिमेला (self-image) कित्येकदा आपल्याला दिल्या गेलेल्या नकारात्मक लेबलमुळे धक्का लागू शकतो आणि ती सुधारण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न आपण केले नाहीत तर आयुष्यभर कुठल्यातरी न्यूनगंडात वावरणारी कित्येक उदाहरणे आपण आजूबाजूला पाहू शकतो.

तेव्हा यापुढे एखाद्या व्यक्तीवर किंवा समूहावर कुठल्याही प्रकारचा शिक्का मारण्याआधी आपण जरा थांबूया का?? सरसकट लेबल देण्याऐवजी त्या व्यक्तीच्या त्या वेळेच्या वर्तनाबद्दल योग्य त्या शब्दात कसं बोलता येईल हे जाणीवपूर्वक ठरवता येईल का? प्रयत्न तर करून बघूया..!!

लेबल हे निर्जीव वस्तूंसाठी असतात, माणसांसाठी नाही !!

2 responses to “सरसकट लेबल..!!”

  1. Harshada phadke Avatar
    Harshada phadke

    मानसी अगदी अचूक शब्दांमध्ये एखाद्याला लेबल लावून त्याच्या व्यक्तिमत्वाची ओळख फक्त एखाद्या कृतीवरून किंवा एखाद्या सवयी वरून ठरवण्याच्या लोकांच्या मानसिकतेचे वर्णन केले आहेस आणि त्यावर उपाय देखील सुचवला आहेस.

    Liked by 1 person

    1. Manasi Sardesai Avatar

      धन्यवाद हर्षदा!!😊

      Like

Leave a comment


Hey!

Hey there, fellow Robloxian! Whether you’re here to discover hidden gem games, level up your building skills, or just stay in the loop with the latest events, you’re in the right place. This blog is all about sharing the coolest things in the Roblox universe—from developer tips to epic game reviews. So grab your Bloxy Cola, hit that follow button, and let’s explore the world of Roblox together! 🚀


Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.