राग मनात धरून ठेवणे हे स्वतः विष पिऊन समोरच्या व्यक्तीच्या मरणाची वाट पाहण्यासारखे आहे.

गौतम बुद्ध

राग ही किती पटकन व्यक्त होणारी भावना असते ना ? म्हणजे बघा ना आपल्या इतर भावना जसे की आनंद, भीती, चिंता, समाधान, प्रेम, अपराधिपणा इत्यादि व्यक्त करायला आपण अनेकदा खूप आढेवेढे घेत असतो म्हणजे सहसा ह्या भावना आपण व्यक्त करत नाही पण राग ही भावना मात्र चटकन व्यक्त होते. रागाच्या बाबतीत असं वाटतं की ह्या भावनेचा रीमोट कंट्रोल आपल्या हातात नसतोच जणू!! कारण दर वेळी आपण, तो तसं बोलला तर मला राग येणारच किंवा ती कशी वागली माझ्याशी मग राग येणार नाही का मला असं बोलून आपल्याला येणाऱ्या रागाचं नुसतं समर्थनच करत नाही तर त्याचं खापर दुसऱ्यावर किंवा परिस्थितीवर फोडून मोकळं होतो. तसंच रागाला नेहमी लक्ष्य लागतं म्हणजे आपण एकतर स्वतःवर राग काढतो किंवा दुसऱ्यावर. पण कारण काहीही असो किंवा लक्ष्य कोणीही असो रागामुळे सगळ्यात जास्त नुकसान स्वतःचंच होतं आणि हे कळतं पण वळत नाही अशी अवस्था असते.

तसं पहायला गेलं तर राग ही भावना अगदी आदिमानवाच्या काळापासूनच अस्तित्वात होती. तेव्हा हिंस्त्र प्राण्यांपासून आणि इतर शत्रूंपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी राग येणे ही त्या आदिमानवाची गरज होती कारण संकटांचा सामना करायचा तर लढायला हवं आणि राग आणि त्वेषाशिवाय ते शक्य नाही. त्यामुळे तेव्हापासून ही भावना जीवनावश्यक समजली जाते. कोणत्याही प्रकारच्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडायची असेल तर त्याचा राग तर यायलाच हवा, नाही का? पण मग राग हा खरंच गरजेचा असेल तर मग त्याला समस्या का म्हटलं जातं? तर ह्याचं उत्तर असं आहे की जेव्हा हा राग नियंत्रण रेषेच्या बाहेर जातो, तेव्हा त्याला समस्येचं रूप प्राप्त होतं कारण तेव्हा या रागाचे पडसाद स्वतःला आणि आजूबाजूच्या लोकांवर उमटतात. अश्या वेळी या रागाचं काहीतरी करायलाच हवं.

खरं तर कुठल्याही भावनेचं काम हे लगेच कृती दाखवणं हेच असतं. म्हणजे माझ्या बॉसने माझं कौतुक केलं तर त्यामुळे मला लगेच आनंद होतो किंवा अंधाऱ्या एकाट रस्त्यावरून जातानाच मला भिती वाटते. म्हणून आपल्याला असं वाटतं की आपली भावना ही त्या क्रियेवर आलेली प्रतिक्रिया असते म्हणजे त्या क्रियेमुळेच आपली भावना निर्माण झाली आहे. पण बारकाईने पहिलं तर आपल्या लक्षात येईल की या क्रिया-प्रतिक्रियेच्या मध्ये एक “पॉज” बटन असतं आणि ते म्हणजे आपले विचार. आता हा मुद्दा आपण रागाच्या बाबतीतच समजावून घेऊ.

समजा मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचे आहे आणि सगळं आटपून मी बाहेर पडणार तेवढ्यात माझ्या मुलाने सॉसची काचेची बाटली फोडली. तर काय होईल? मला नुसता राग येणार नाही तर कदाचित माझा संताप माझ्या मुलाच्या पाठीत एक धपाटा बनून बरसेल आणि हे एवढ्यावरच थांबणार नाही तर मी त्याला त्याच्या सवयी, धांदरटपणा, आणि अश्या अनेक किंबहुना प्रसंगानुरूप नसलेल्या देखील गोष्टींवरून “लेक्चर” देऊ लागेल. आणि अर्थातच ह्यामुळे मला तो सगळा पसारा आवरून बाहेर निघायला किती उशीर झाला ही खदखद मनात घेऊनच मी बाहेर पडेन. माझ्या कामावर ह्याचा परिणाम होऊ शकतो किंवा तो प्रत्यक्षपणे झाला नाही तरी माझ्या कामात येणाऱ्या कोणत्याही अडचणीचा संबंध विनासायास मी झालेल्या प्रसंगाशी जोडेन आणि त्रागा करत राहीन.

आता या प्रसंगाबद्दल बोलतांना आपण फक्त मुलाकडून सॉसची बाटली फुटणे (क्रिया) मुळे मला राग आला (प्रतिक्रिया) हे दोनच पैलू बघतो पण या सगळ्यात आपण हे विसरून जातो की ह्या दोन्ही मध्ये आपल्या विचारांचा एक पॉज असतो जो आपल्या नियंत्रणामधील घटक असतो ज्याकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष करतो. खरं तर मुलाकडून सॉसची बाटली फुटणे या क्रियेनंतर मी काय विचार करते यावर माझी प्रतिक्रिया जास्त अवलंबून असते. त्यावेळी माझ्याही नकळत ” अरे देवा, घातला गोंधळ या गधड्याने, एक काम नीट करेल तर शपथ आहे, आता सगळं आवरून बाहेर पडावं लागेल नाहीतर अजून काहीतरी उद्योग करून ठेवेल हा. ह्याला पण आताच करायचं होतं का हे सगळं, तिकडे पोहोचायला उशीर झाला तर ते पण काम होणार नाही. एक काम पण नीट होत नाही माझं, सगळीकडे अडथळे आहेतच ” हे एवढे सगळे स्वगत माझ्या मनात चालू असते आणि त्यामुळेच माझी प्रतिक्रिया अशी उग्र स्वरूपाची येते.

हे सगळं इतकं “ऑटोमॅटिक मोड” मध्ये घडल्यासारखं वाटतं कारण आपल्या मेंदूला हेच क्रिया-प्रतिक्रियेचे रस्ते सरावाचे झाले असतात. वेगळा प्रतिसाद हवा असेल तर प्रयत्नपूर्वक पॉजचं बटन दाबून आपल्या विचारात बदल करावा लागेल. आणि हे एकदाच करून थांबून चालणार नाही तर प्रत्येकवेळी “क्रिया- विचारांचा पॉज-प्रतिक्रिया” हा रस्ता जाणीवपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक मेंदूच्या सरावाचा करून द्यावा लागेल. मेंदूला एकदा हा सराव झाला की आपोआपच आपले कोणत्याही घटनेवर तडक आणि उग्र स्वरूपाची प्रतिक्रिया देणे कमी होईल. आपला राग संताप किंवा हिंसा या टोकावर न पोचता वैताग किंवा थोडीफार चिडचिड या स्वरूपात जरी राहिला तरी बऱ्यापैकी चालू शकतो.

कोणतीही भावना पूर्णपणे नाहीशी होणे (जरी ती आपल्याला नकारात्मक वाटत असली तरीही) हे वस्तुतः शक्य नाही पण या भावनेची तीव्रता (intensity) आणि वारंवारिता (frequency) कमी करणे हे मात्र नक्कीच केल्या जाऊ शकतं. मग पुढच्या वेळी राग आला तर तुमच्या विचारांचं पॉज बटन नक्की “ऑन” करा, बघा काही फरक जाणवतोय का ??

राग कोणालाही येऊ शकतो—ते सोपं आहे. पण योग्य व्यक्तीवर, योग्य प्रमाणात, योग्य वेळी, योग्य हेतुसाठी, आणि योग्य पद्धतीने रागवणे–ते सोपं नाहीये!!

एरिस्टॉटल .


Leave a comment