आज १० ऑक्टोबर, जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून ओळखला जातो, त्यानिमित्याने हा लेखप्रपंच!

‘मन’ तसा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे या मनाशी आपली ओळख खरे तर मराठी साहित्यातून झाली. अगदी लहानपणापासुनच आपल्याला मनाचे श्लोक आवर्जुन शिकवले जायचे आणि त्यावेळी त्याचा अर्थ जरी कळत नसला तरी, नित्यनेमाने आपण ते रोज म्हणत असू. मग पुढे शाळेत गेल्यावर कवितांमधून मनाशी मैत्री झाली. बहिणाबाईंच्या “मन वढाय, वढाय, उभ्या पिकातलं ढोर, किती हाकलं हाकलं, फिरी येते पिकावर!” या कवितेपासून ते अगदी आजकालच्या  नवकवी संदीप खरे यांच्या “मन तळ्यात, मळ्यात…जाईच्या कळ्यात!” या  हळव्या कवितेपर्यंत कित्येक कवींनी आपल्या कवितेमधुन मनाच्या वेगवेगळ्या छटा आपल्यापर्यंत पोहचवल्या. अनेक कथा कादंऱ्यांमधून  सुद्धा या मनाचे अनेक कंगोरे आपल्यासमोर उलगडले. तर असे हे मन आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग असलं तरी अगदी अलिकडेपर्यंत त्याची मुशाफिरी साहित्याच्या क्षेत्रापर्यंत मर्यादित होती पण आरोग्याच्या  परिघातही ‘मन’ हा केंद्रबिंदु असतो, हा विचार आता बऱ्यापैकी आपल्या परिचयाचा झाला आहे. आरोग्य हा तसा विस्तृत विषय. आपल्या शरीराच्या महत्त्वाच्या मापदंडांच्या संतुलनाची अवस्था म्हणजे आरोग्य अशी आरोग्याची मोघम व्याख्या केली जात असे. आणि हे मापदंड म्हणजे हृदयाच्या ठोकयांची गती, रक्तदाब, नाडीची गती, श्वासोश्वासाची गती इत्यादी शरीरविज्ञानाशी निगडीत असलेले घटक होते पण आरोग्य केवळ या शारीरिक बाबींपुरते मर्यादित नसून त्यात मानसिक घटकांचीही महत्वाची भूमिका आहे हे  अनेक वर्षांच्या संशोधनानंतर सिद्ध झालं. आणि मग आपलं शरीर जसं आजारी पडु शकतं अगदी तसचं आपलं मनही आजारी पडतं ही कल्पना जनमानसात रुजू लागली.

आता आजार म्हटला की त्यावर उपचार करणारे डॉक्टरही आले. मग गंभीर मानसिक आजारांवर उपचार करणारे मनोविकारतज्ञ (psychiatrist), आणि दैनंदिन जीवनातल्या मानसिक समस्यांवर उपचार करणारे मानसोपचारतज्ञ (psychologist) आपल्या ओळखीचे झाले. पण असे असले तरी मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात म्हणावी तशी जागरुकता अजुनही निर्माण झाली नाही असं म्हणणं पूर्णपणे चुकीचे ठरणार नाही.

आपल्या सर्वांच्या रोजच्या आयुष्यात आपण अनेक प्रकारच्या भावना अनुभवत असतो कधी या भावना आनंददायी असतात तर कधी त्रासदायक! त्रासदायक भावना आपल्याला अस्वस्थ करतात आणि काही काळापुरता निष्क्रिय सुद्धा! पण कालांतराने या भावनांची तीव्रता कमी होते आणि आपण पुन्हा कार्यक्षम होतो. म्हणजे चिडचिड होणे, वैताग येणे, दु:ख होणे, खंत वाटणे या सगळ्या भावना अनुभवत असताना माणूस तणावात असतो (distress). पण बरेचदा या सगळ्या भावनांचा निचरा होतो आणि आपण त्या तणावाच्या स्थितीतून बाहेर येतो. काही लोकांमध्ये या त्रासदायक भावना बऱ्याच काळापर्यंत मनात घर करून बसतात आणि त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर खोल परिणाम करतात. अश्या वेळी भावना मनोविकाराचे रूप घेतात (disorder). मनोविकारतज्ञांचे मार्गदर्शन आणि योग्य औषधोपचार यांच्या मदतीने काही मनोविकार पूर्णपणे बरे करता येतात तर इतर मनोविकार व्यवस्थितपणे हाताळले जाऊ शकतात.

आपल्या तणावाचे व्यवस्थापन करणे मात्र सर्वस्वी आपली जबाबदारी असते. अर्थात यासाठी सुद्धा मानसोपचारतज्ञांची मदत घेता येते पण तरीही पहिले पाऊल आपल्यालाच उचलावे लागते. आणि हे पहिले पाऊल म्हणजे आपल्या त्रासदायक भावनांचा स्वीकार करणे. कारण आपल्या मानवी प्रवृत्तीनुसार आपण फक्त आनंददायी भावनांना कवटाळून बसतो मात्र आपल्याच त्रास देणाऱ्या भावनांपासून दूर पळतो. अगदी या भावनांचं बिल आपण सहजपणे एकतर इतरांवर किंवा परिस्थितीवर फाडून मोकळे होतो. म्हणजे मग आपल्याला सोयीस्करपणे जबाबदारी झटकता येते कारण माझा राग, माझे दु:ख, माझा वैताग हा दुसऱ्यांमुळे किंवा परिस्थितीमुळे ओढवला असल्यामुळे हे घटक बदलल्याशिवाय माझ्या या भावनांचे काहीच होऊ शकत नाही असे मुळी फर्मानच आपण काढले असते. आता जर मला ताप आला तर तो पावसात भिजल्याने, आईस्क्रीम खाल्ल्याने किंवा कुठल्या वायरस-बॅक्टीरियामुळे आला असू शकतो पण आपण तेव्हा असं म्हणतो का की ह्यांना औषध द्या म्हणजे मग माझा ताप आपोआपच जाईल किंवा ते दूर राहिले माझ्यापासून तर मला तापच येणार नाही!! बघा, म्हणजे हे ऐकायलाही किती गमतीदार वाटतं ना, पण हे असंच आपण आपल्या भावनांच्या बाबतीत करतो. आपल्याच भावना आपल्याला त्रास देत असतील तर उपचारही आपल्याला स्वतःवर करावे लागतील ना ? ही एवढी साधी जाणीव जरी आपल्याला झाली तरी मानसिक आरोग्याच्या दिशेने आपला प्रवास सुरू करता येईल आणि हा प्रवास निरंतर चालू ठेवणे हेच आपले ध्येय असायला हवे!


Leave a comment