
सवयीला जर वेळीच आवर घातला नाही तर ती गरज बनते!!
“झोपेतून उठल्यावर हातात गरमागरम चहाचा कप आणि वर्तमानपत्र याशिवाय माझी सकाळच पूर्ण होत नाही.” “त्याला हाती घेतलेलं काम अपूर्ण ठेवायची घाणेरडी सवय आहे.” “छोटी दिशा तिच्या सगळ्या वस्तु अगदी नीट जागेवर ठेवते, किती छान सवय आहे ना तिला.” ही आणि अशी अनेक वाक्ये सतत आपल्या कानावर पडत असतात. आपणच वारंवार करत असलेल्या कित्येक छोट्या छोट्या कृती कधी आपल्या अंगवळणी पडतात आणि मग त्या फार काही कष्टांशिवाय आपल्याकडून सहज घडायला लागल्या की त्याचे “सवय” असे गोड नामकरण आपण करून टाकतो. खरंतर या सवयी म्हणजे आपल्या मेंदूने केलेली एक क्लृप्तीच असते. म्हणजे बघा, रोज उठल्यावर आपले दात कसे घासायचे, चहा-कॉफी, नाष्टयाचा एखादा पदार्थ कसा बनवायचा, गाडी कशी चालवायची असे प्रश्न रोजच्या रोज आपल्याला पडले असते तर काय झालं असतं?? अक्षरशः वेड लागायची पाळी आली असती, मेंदूला तर त्याची सगळी कुमक यावरच खर्च करावी लागली असती. पण आपला मेंदू खूप हुशार असतो, त्याचं मुख्य काम असतं आपल्याला जिवंत ठेवणं आणि त्यासाठी तो त्याची जास्तीतजास्त शक्ति वापरत असतो. म्हणून मग वेगवेगळ्या परिस्थितीजन्य संकेतांसाठी विशिष्ट कृती विनासायास घडवण्याची व्यवस्था तो करतो जेणेकरून यात कमितकमी शक्ति खर्च होईल. अशा रीतीने, विशिष्ट परिस्थितीत एकच एक कृती वारंवार केल्याने आपल्याला त्याची ‘सवय’ झाली असं आपण म्हणतो. आणि आपल्या दिनक्रमातील जवळजवळ ९० टक्के गोष्टी या सवयीचाच भाग असतात.
आता या सवयी नेमक्या लागतात कश्या??? न्यूयॉर्क टाइम्स चे पत्रकार आणि ‘द पॉवर ऑफ हॅबिट’ या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक चार्ल्स दुहिग यांच्या मते सवय ३ घटकांच्या वर्तुळाकार आवर्तनातून जन्मास येते. हे तीन घटक म्हणजे ‘cue‘ (संकेत), ‘routine‘ (नित्यक्रम/परिपाठ) आणि ‘reward‘ (बक्षीस). आता यामध्ये संकेत हा एक प्रकारच्या ट्रिगर सारखे काम करतो ज्यातून एखाद्या सवयीची सुरवात होऊ शकते. संकेत ही एखादी वेळ असू शकते, एखादी जागा असू शकते, मनाची एखादी अवस्था असू शकते किंवा मग एखादी व्यक्तिसुद्धा असू शकते. जसं की, सकाळी उठल्यावर मी चहा पितो, सोफ्यावर येऊन बसलो की मी टीव्ही पाहत बसतो किंवा माझा मूड खराब असेल तर मी चॉकलेट खाते, माझा हा मित्र आला की मी त्याच्यासोबत सिगरेट प्यायला जातो. ही आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील ज्यात त्या त्या संकेताला अनुसरून एखादी कृती घडत असते. एकदा का मेंदू अश्या कोणत्याही संकेताने ट्रिगर झाला की मग मेंदू त्या संबंधित कृती पूर्णत्वास नेण्याचा चंग बांधतो. म्हणजे सकाळी उठल्याबरोबर चहा पिणे किंवा मूड खराब झाला की चॉकलेट खाणे, इत्यादि. त्यानंतर येतो तो सगळ्यात महत्वाचा घटक आणि तो म्हणजे reward किंवा बक्षीस!! जेव्हा एखादी कृती करून आपल्याला छान वाटते, तेव्हा मेंदूत डोपामाइन नावाचे संप्रेरक (hormone) तयार होते ज्यामुळे आपल्याला ही छान, समाधानाची, आनंदाची अनुभूति होते. त्यामुळे आपला मेंदू उत्तेजित होतो आणि ती कृती वारंवार होण्यासाठी धडपड करतो. कारण मेंदुसाठी डोपामाइन हेच खरे बक्षीस असते. मग चहा पिणे ह्यासारखी छोटी कृती असो किंवा रात्री बऱ्याच वेळ जागून पाहिलेली एखादी वेब सिरीज असो, मित्रांसोबत सहज म्हणून घेतलेले एखादे ड्रिंक असो ह्यामधून मेंदूला हवे ते डोपामाइन मिळते आणि परिणामी आपल्याला छान आणि आनंदी वाटते.
मग हळू हळू ओळखीचा संकेत मिळाला की मेंदू डोपामाइनच्या गरजेपोटी त्या संबंधित कृती करायला आपल्याला प्रवृत्त करतो आणि आपणही आनंदाची-समाधानाची अनुभूति मिळवण्यासाठी ती कृती पूर्ण करतो आणि अगदी सहजपणे त्या कृतीला सवयीचे गोंडस नाव देऊन मोकळे होतो. एकदा का हे ‘cue-routine-reward’ हे चक्र कार्यान्वित झालं की मग मेंदू त्यातून आपला हात काढून घेतो म्हणजे अगदी हे चक्र थांबवण्याचं निर्णय स्वातंत्र्य सुद्धा तो बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या कामांना लागतो. खरंतर एखाद्या संकेतासाठी अनेक नित्यक्रम असू शकतात पण विनासायास सुख, आनंद देणारा पर्याय निवडणे ही मानवी वृत्ती आहे. त्यामुळे सकाळी उठून फिरायला किंवा व्यायाम करायला जाण्यापेक्षा गरम चहाचे घोट घेत निवांत पेपर वाचत बसणे किंवा रात्री एखादे छानसे पुस्तक वाचून झोपण्यापेक्षा मोबाइल स्क्रोल करत जागणे हे नेहमीच सहजसोपे वाटते.
एखादी “सवय” जेव्हा आपल्याला नुकसानदायक ठरू लागते तेव्हा ती जाणीवपूर्वक बदललेलीच बरी! आणि त्यासाठी प्रयत्न करून नेहमीच संकेत-नित्यक्रम हा पॅटर्न बदलावा लागतो. जोपर्यंत मेंदूला नवीन पर्याय दिले जात नाहीत तोपर्यंत तो जुनेच मार्ग अवलंबिले जातात. म्हणून संकेतला साजेसे नवे नित्यक्रम शोधून त्याचे सातत्य कायम ठेवायला हवे. हयासाठी दोन संकेत एकमेकांशी जोडता येऊ शकतात जसे की सकाळी उठणे आणि रात्रीच वाटीत काढून ठेवलेला सुकामेवा हे दोन संकेत एकत्र झाले की उठल्याबरोबर सुकामेवा खाण्याची कृती त्याला जोडता येईल. म्हणजे एक नवीन संकेत-नित्यक्रम हा पॅटर्न आपल्याला मिळेल. ह्या कृतीमुळे होणारे फायदे आपण सतत स्वतःला सांगत राहिलो तर चांगले आरोग्याचे बक्षीस आपल्याला मिळेल ही जाणीव पण सारखी होत राहील.
एक मात्र नक्की लक्षात ठेवा, कोणतीही सवय बदलणे यासाठी कष्ट आणि सातत्य हवेच आणि त्याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे बदलाची जाणीव कारण तीच कृती करायला प्रवृत्त करते. म्हणून तुम्ही आपल्या सवयींचे गुलाम नाही तर मालक बना!! चला तर मग.. कोणती सवय बदलायची तुम्हाला??
शेवटी,
चांगल्या आणि वाईट दोन्ही सवयी फक्त सरावानेच आत्मसात केल्या जाऊ शकतात.
