आपल्या मुलांना आपण काय द्यायला हवे??

“मी नेहमीच शिकायला तयार असतो, पण मला नेहमी शिकवलेले आवडत नाही.”

विस्टन चर्चिल

आजकाल मूल जन्माला येतं त्या क्षणापासूनच खरं तर आपण त्याला/तिला काही न काही देत असतो. अर्थात, आपल्या मुलांना सुरक्षित वातावरण, चांगल्या सोयीसुविधा, चांगलं शिक्षण या गोष्टी देणे हे आपलं कर्तव्यच असतं आणि हे कर्तव्य प्रत्येक पालक आपापल्या परीने पूर्ण करत असतो. किंबहुना त्याही पेक्षा खूप जास्त काहीतरी देण्यासाठी आपला पालक म्हणून खटाटोप चालू असतो. पण थोडा विचार केला तर लक्षात येतं की मूलभूत गरजा आणि प्रेमळ, तणावरहित वातावरण सोडल्यास बाकी इतर गोष्टी आपल्या मुलांना देण्यामागे ‘हे आपल्याला लहानपणी मिळालं नाही, आता मला परवडतं तर मी माझ्या मुलांना का देऊ नये किंवा आजकाल सगळेच तर हे करतात’ यासारखी अनेक कारणे असतात. मग त्यासाठी लेटेस्ट फॅशनचे कपडे, नवनवीन खेळणे घेणे, हॉटेलमधील वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थांचा आस्वाद घेणे, भारतातील किंवा भारताबाहेरील प्रसिद्ध ठिकाणी केलेले प्रवास ह्या अश्या बऱ्याचशा गोष्टी आपण मुलांसाठी करत असतो. अर्थात यात काही वाईट आहे असं माझं अजिबात मत नाही. पण ह्या सगळ्या सोबत अजून एक महत्वाची गोष्ट आपण मुलांसाठी करू शकतो ती म्हणजे त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव देणे.

आपण सगळेच पालक आपल्या रोजच्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक जीवनात इतके व्यस्त असतो की मुलांसोबत आपल्याला फार कमी वेळ मिळतो जो साहजिकच आपल्याला आनंददायी आणि आरामदायक होईल याकडे आपला जास्त कल असतो. या नादात आपण बऱ्याच वेळेला मुलांना पैशाने विकत घेता येतील अशाच गोष्टी देतो, पण त्याहीपेक्षा जास्त महत्वाचे असतात मुलांना लहान वयात मिळणारे मौल्यवान अनुभव. खरंतर या अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पण त्या पालक म्हणून आपल्याला प्रयत्नपूर्वक करायला हव्यात. कधीतरी सकाळी उठून मुलांसोबत एखाद्या टेकडीवर जाणे, तिथली झाडे, झुडपे, फुले, पक्षी, त्यांचे आवाज याकडे लक्ष देणे, किंवा आपल्या शहरातील एखाद्या ऐतिहासिक वास्तुला भेट देणे आणि तिथली माहिती जाणून घेणे, आठवडी बाजारात मुलांना घेऊन जाणे, तिथल्या भाज्या, फळे, आणि तिथे चालणारे व्यवहार व इतर गोष्टींचा प्रत्यक्ष बघू देणे, एखादे बालनाट्य, गाण्याचा कार्यक्रम यासाठी घेऊन जाणे असे अनेक अनुभव आपण देऊ शकलो तर मुलांना बाहेर जाणे म्हणजे फक्त खाणे, पिणे आणि मज्जा करणे एवढेच नसते हे दाखवता येईल. शिवाय मुलांची निरीक्षण शक्ति, कुतूहल, अनेक गोष्टीकडे लक्ष देण्याची क्षमता, एकाग्रता या सगळ्या कौशल्यांना चालना मिळेल. आपण बहुतेकदा वीकएंडला मुलांना बाहेर नेत असतोच मग महिन्यातून १-२ वेळा अशा ठिकाणी नेलं तर त्यांनाही नवीन जगाची ओळख होते. खूप पैसे खर्च करूनच आनंद मिळवता येतो असे नाही तर छोट्या छोट्या गोष्टीतून सुद्धा आनंद सहज मिळतो हे सुद्धा मुलांना समजते. या उपक्रमात इतर पालकांनादेखील सहभागी करून घेता येईल म्हणजे आळीपाळीने दोन मुलांचे पालक त्यांच्या मुलांसोबत त्यांच्या २-३ मित्र-मैत्रिणींना सोबत घेऊन जाऊ शकतील. यात मुलांनादेखील मजा येईल आणि पालकांचा वेळेचा प्रश्नदेखील सुटेल.

सध्या सगळीकडे टीव्ही/मोबाईलच्या अतिवापराबद्दल तक्रार केली जाते पण त्याला पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न थोडाफार का होईना आपणच करायला हवा. जितक्या लहान वयात मुलांना या पर्यायांची ओळख होईल तितकी त्यांना इतर छंद निर्माण होण्याची शक्यता जास्त!! मूल पहिली-दुसरीत असल्यापासून जर याची सुरवात केली तर नक्कीच फायदा होऊ शकतो. कारण मुलांचे वय वाढत जाते तसे त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये प्रचलित असलेल्या गोष्टी त्यांना जास्त आकर्षक वाटू लागतात. पण लहान वयात निर्माण झालेली एखादी सवय किंवा आवड मात्र ते त्यांच्यापुरती जोपासू शकतात. तसं मला हे सगळं कळायला आणि करायला उशीर झाला पण माझ्या मुलाच्या बाबतीत मी हे नक्कीच अनुभवले आहे. त्याला दिलेल्या वेगवेगळ्या अनुभवांमुळे वेगवेगळ्या विषयात त्याची आवड निर्माण झाली. आणि आवड असली की मुलं आपोआपच ती गोष्ट करतात त्यासाठी जास्त मागे लागावे लागत नाही.

तेव्हा मुलांना मॉल, सिनेमा, बाहेर खाणे, खरेदी, फोटो काढणे याबरोबरच या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंदसुद्धा कळू द्या. कारण हा आनंद दीर्घ काळ त्यांच्या सोबत राहील यात शंका नाही.

शिकणे म्हणजे अनुभव घेणे, बाकी सर्व फक्त माहिती असते!!

अल्बर्ट आईनस्टाइन

Leave a comment