आपल्याला पालकत्व “शिकण्याची” खरोखर गरज आहे का??


स्वतःवर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक मुलाच्या मागे एक पालक असतो ज्यांनी प्रथम त्यांच्या मुलावर विश्वास ठेवला असतो.

अतिरेकी माहितीच्या या युगात जिथे आपण दररोज काय खावे, काय घालावे, कसे वागावे या सर्व गोष्टींबद्दल भरपूर माहितीचा सतत भडिमार होत असतो, तेथे त्या पैलूंबद्दल देखील आपण बहुतेकदा गोंधळलेले असतो जे अन्यथा आपल्याला खूप नैसर्गिक आणि क्षुल्लक वाटतात. पालकत्व ही अशी एक गोष्ट आहे जी आपल्याला खूप परिचित आहे. पिढ्यानपिढ्या असे मानले जात होते की लग्न हे पालकत्वाचा एक मार्ग आहे. आणि एकदा तुम्ही मुलाला जन्म दिला की, तुम्ही स्वतः आपोआप एक तज्ञ पालक बनता किंवा तुमच्या कुटुंबातील किंवा नातेवाईकांमधील इतर “तज्ञांकडून” प्रशिक्षित होता. आणि मुले कोणाच्याही विशेष प्रयत्नांशिवाय आपोआप मोठी होतात. आता, कुटुंबे, नातेसंबंध, विवाह आणि अपत्य जन्माचे संपूर्ण चित्र बदलत असताना, आपण पालकत्वाच्या जुन्या पद्धतींवर अवलंबून पुढे जाऊ शकत नाही.

मी असे म्हणणार नाही की जुन्या पालकत्वाच्या पद्धती निरुपयोगी होत्या पण त्या निर्दोषही नव्हत्या, कारण जर त्या निर्दोष असत्या तर आपल्या आजूबाजूला इतके त्रस्त प्रौढ लोक दिसले नसते. आपण आपले बालपणीचे अनुभव प्रौढत्वात आपल्यासोबत घेऊन जातो आणि आपल्या धारणांवर विचारपूर्वक काम केले नाही तर ते आपल्या जीवनावर आणि पालकत्वाच्या शैलीवर खूप प्रभाव पाडतात. जर या धारणा आजच्या जगाशी सुसंगत नसतील, तर आपणच आपल्या मुलांच्या संगोपनात अनेक समस्या निर्माण करतो. म्हणून, येथे ‘पालकत्व शिकणे’ म्हणजे आपल्या पूर्वग्रहदूषित कल्पना बाजूला ठेवून आपली मुले ज्या जगात जगत आहेत त्याकडे त्यांच्या डोळ्यांनी पाहणे. कारण आपण मोठे असलो तरी याचा अर्थ असा नाही की आपल्याला सर्वच माहित आहे!! शिवाय, पालक म्हणून आपले वय नेहमीच आपल्या मुलाच्या वयाइतकेच असते म्हणून आपण पालक म्हणून आपल्या मुलासोबतच वाटचाल करत असतो.

काळ बदलला आहे हे खरे आहे पण बदलत्या काळातही पालकत्वाच्या प्रवासात कुटुंब आणि सामाजिक आधार प्रणालींची भूमिका आपण नाकारू शकत नाही. खरं तर, “मुलाला वाढवायला एक अख्खं गाव लागतं” ही जपानी म्हण अजूनही खरी आहे. जेव्हा आपण ‘आपल्या समस्या स्वतःहून हाताळण्याचा’ दृष्टिकोन स्वीकारतो तेव्हा आपल्याला अनेकदा हरवलेले आणि निराश वाटते. म्हणून, आपण एकत्र येऊन चर्चा करायला हवी, काही योजना आखल्या पाहिजेत, त्या वापरून पाहिल्या पाहिजेत, आपल्या मुलांना अनुकूल अशा प्रकारे त्या सुधारल्या पाहिजेत, आपल्या लहान मुलांसोबत असे प्रयोग करत असताना कधी मिळालेले छोटे विजय तसेच कधी झालेल्या गमतीशीर चुका इतर पालकांबरोबर शेअर केल्या पाहिजेत आणि संपूर्ण प्रवासात वेगवेगळ्या पर्यायांसह प्रयोग करत राहायला हवे. शेवटी, पालकत्वाची कोणतीही पद्धत परिपूर्ण नसते. त्यामुळे परिपूर्णतेचा अट्टहास धरणेसुद्धा मूर्खपणाचे ठरेल.

मुलांना बदलण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी पालकांनी स्वतःला बदलण्याची आवश्यकता आहे या मुद्द्यावर अनेकदा टीका केली जाते परंतु तुम्ही फक्त स्वतःमध्ये बदल घडवू शकता, इतरांमध्ये नाही हे तथ्य मुलांच्या बाबतीत देखील खरे आहे. किमान, येथे आपला एक फायदा आहे की मुले बहुतेकदा त्यांच्या पालकांचे अनुसरण किंवा अनुकरण करतात, मग आपण चांगले उदाहरण का होऊ नये. चांगले पालकत्व आपल्या मुलांना सर्व गोष्टींपासून प्रतिबंधित करणे नाही किंवा त्यांना त्यांच्या इच्छेनुसार मुक्तपणे काहीही करू देणे ही नाही, तर आवश्यकतेनुसार या दोन्ही धोरणांचा वापर करणे आहे. शेवटी महत्वाचे : आपले मूल जे काही चांगले किंवा वाईट करते त्यासाठी आपण पूर्णपणे जबाबदार नाही, म्हणून स्वतःला दोष देण्याची किंवा स्वतःवर शंका घेण्याची गरज नाही. फक्त जागरूक रहा आणि जेव्हा तुम्ही चुकता तेव्हा पुन्हा मार्गावर या! लक्षात ठेवा, आनंदी पालकच आनंदी मुलं घडवतात!!

तुमची मुले तुम्ही जसे आहात तशीच होऊ शकतात; म्हणून तुम्हाला ती जशी हवी आहेत तसे तुम्ही बना!!



Leave a comment