
आनंद.. हा शब्द ऐकला तरी मनात थुई थुई कारंजे उडायला लागतात. खरंच किती हवीहवीशी वाटणारी गोष्ट असतो हा आनंद! अर्थात दुसऱ्याचा आनंद बघून पोटात दुखणाऱ्या व्यक्तीही आपल्या आजूबाजूला असतातच. पण तरीसुद्धा आनंद मग तो स्वतःचा असो किंवा दुसऱ्यांचा सुखकारकच असतो. आपण सगळेच अविरतपणे या आनंदाच्या शोधत असतो. चला तर मग बघूया हवाहवासा वाटणारा हा आनंद नेमका दडलाय तरी कुठे!
आनंद ही अशी संकल्पना आहे ज्याच्याबद्दल बरंच काही बोलल्या आणि लिहिल्या गेलं आहे पण तरीसुद्धा आनंदाची अगदी शास्त्रोक्त व्याख्याच करायची झाली तर ती एक भावनिक स्वास्थ्याची अवस्था आहे, जी आपण अनुभवतो जेव्हा काही मनासारख्या चांगल्या गोष्टी घडतात किंवा एखाद्याच्या एकूणच आयुष्याचं किंवा त्याच्या सिद्धतांच निश्चित असं मूल्यमापन झाल्याने येणारी एक व्यक्तिनिष्ठ स्वास्थ्याची अवस्था! आनंद या भावनेला व्यक्तिनिष्ठ म्हटलं जातं कारण कोणाला कशामधून आनंद मिळेल हे व्यक्तिनुरूप बदलत जातं. म्हणजे एखाद्या व्यक्तीला ज्यातून आनंद मिळत असेल, त्यातून दुसऱ्या व्यक्तीला कदाचित आनंद मिळणार नाही. म्हणूनच या भावनेचा अनुभवही व्यक्तिनुरूप बदलत जातो.
आता आपल्याला आनंद होतो म्हणजे मेंदूच्या पातळीवर नेमकं काय होतं? आपल्या आवडीची एखादी गोष्ट करतांना, आपल्या मेंदुमध्ये डोपामाइन (Dopamine) आणि सेरोटोनिन (Serotonin) ही दोन रसायने स्त्रवतात, आणि त्यातूनच आपल्याला या आनंदाची अनुभूति होते. आणि ही अनुभूति फक्त मेंदुपुरतीच मर्यादित राहत नाही तर शरीरातील इतर संस्थांपर्यंतही पोहचते आणि मग हा आनंद आपल्या शरीरभर पसरतो. म्हणूनच तर आपल्याला ही भावना इतकी हवीहवीशी वाटते. पण तरीसुद्धा आनंदाच्या बाबतीत एक चूक आपण बरेचदा करत असतो ती म्हणजे सतत त्याचा शोध घेणे. म्हणजे एकतर मी मला आनंद कशातून मिळेल हे शोधत असते किंवा मग जर एखाद्या गोष्टीतून आनंद मिळालाच तर तो सतत कसा टिकून राहील याचा विचार करत असते. या चढाओढीत आपली फक्त फरफट होते . यात आपण एक गोष्ट मात्र नेमकी विसरतो ती म्हणजे आनंद ही खरं तर इकडे तिकडे शोधायची गोष्टच नाहीये ती तर आपल्यातच असते, आपण फक्त लक्ष दिले पाहिजे.
मला नेमके काय म्हणायचे आहे हे कदाचित एका छोट्याश्या गोष्टीतून स्पष्ट होईल. अन्थनी दे मेलो या लेखकानी लिहिलेल्या “सॉन्ग ऑफ द बर्ड” या पुस्तकातील ही गोष्ट अलीकडेच माझ्या वाचनात आली. एकदा एक छोटा मासा दुसऱ्या मास्याकडे जाऊन म्हणाला, “ तुम्ही माझ्यापेक्षा मोठे आहात, तर तुम्ही मला सांगू शकता का, की महासागर नावाची ही गोष्ट नेमकी कुठे सापडेल मला?” त्यावर तो वयोवृद्ध मासा उत्तरला, “बेटा, तू आता जिथे आहेस तोच तर महासागर आहे.” “काय, हा? पण हे तर फक्त पाणी आहे आणि मला तर महासागराचा शोध घ्यायचाय.” एवढे म्हणून तो लहान मासा हिरमुसून दुसरीकडे शोधायला निघून गेला. आपलं पण खरं तर या मास्यासारखच होत असतं, नाही का?
आपण जे बाहेर शोधत असतो, ते क्षणिक सुख असतं. मग एकतर ते एखाद्या वस्तूमध्ये असो किंवा एखाद्या ध्येयामध्ये! जे हवं ते मिळालं की आपल्याला जो आनंद होतो, तो फार काळ टिकत मात्र नाही कारण त्यापुढंच काहीतरी आपल्याला खुणावू लागतं.
पण मुळात आनंदी असणं ही एक वृत्ती आहे जी आपण स्वतःच जोपासू शकतो. आणि त्यासाठी फार काही करायला हवं असं नाही. आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहणं आणि त्याबद्दल कृतज्ञ असणं हे सर्वात महत्वाचं. म्हणजे कुठलीच नवी गोष्ट मिळवण्यासाठी प्रयत्न न करता विरक्त आयुष्य जगणे असं याचा अर्थ नक्कीच नाही पण फक्त आपला आनंद अश्या भौतिक आणि क्षणिक गोष्टींशी न जोडता कायम त्याचा आस्वाद घेणं शिकायला हवं. स्वतःच्या शरीराची आणि मनाची काळजी घेणे, सकारात्मकता आणि आशावादाने आयुष्य जगणे, वर्तमानात जगणे, एखादा छंद जोपासणे, निसर्गाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करणे, आपल्या क्षमतेप्रमाणे कुठल्याही स्वरूपात कोणासाठी काहीतरी निस्वार्थ हेतूने करणे अश्या अनेक गोष्टींमधून आपण आनंदी वृत्ती जोपासू शकतो.
गौतम बुद्ध यांनी म्हटलेच आहे की,
तुम्ही कोण आहात किंवा तुमच्याकडे काय आहे यावर तुमचा आनंद कधीच अवलंबून नसतो, तो फक्त तुमच्या विचारांवर विसंबून असतो!
चल तर मग, करायची सुरुवात आनंदी असण्याची??
