जर आपण एकमेकांबद्दल न बोलता एकमेकांशी बोलू लागलो, तर जगातल्या बऱ्याचशा समस्या नाहीशा होतील!!

आपण जन्माला येतो तेव्हापासूनच वेगवेगळ्या नात्यांशी आपली ओळख होते. काही नाती आपल्यासोबतच जन्माला येतात तर काही आपण आपल्या स्वतः साठी निवडतो पण अशी हि अनेक नाती अगदी मरेपर्यंत आपली सोबत करतात. आजकाल नातेसंबंधांविषयी खूप ओरड ऐकू येते. आधी कशी नाती खूप जपली जायची आणि आता फक्त स्वार्थ जपला जातो वगैरे, वगैरे. अर्थात या वादात शिरण्यात तसा काही अर्थ नाही कारण पूर्वीच्या काळी स्वार्थ अजिबातच नव्हता आणि आता कोणत्याच नात्यात प्रेम आणि ओलावा जपला जात नाही असं कोणीच खात्रीने सांगू शकत नाही. त्यामुळे असा सार्वत्रिक निष्कर्ष काढणं चुकीचं ठरेल.

तर सध्या आपण आपल्या आजूबाजूला अनेक नात्यांमधल्या विविध समस्यांबद्दल ऐकत असतो किंवा त्या पहात असतो. कधी कधी आपण स्वतः देखील आपल्या जवळच्या नात्यात ताणतणाव अनुभवतो जे अगदी स्वाभाविक असते. तर अश्या या समस्या झटपट सोडवण्याकडे प्रत्येकाचा कल असला तरी बरेच वेळा नात्यातल्या गाठी सुटण्याऐवजी अधिकच घट्ट होतात आणि मग आपण हतबल होऊन जातो. नात्यामधल्या अडचणी सोडवताना आपण “नेमकी समस्या ओळखणे” या पायरीकडे सहज दुर्लक्ष करतो. कारण आपलं सगळं लक्ष “इन्स्टंट सोलुशन” वर असतं. पण जरा शांतपणे ह्या समस्यांची उकल केली तर लक्षात येऊ शकतं की बऱ्याच समस्यांच्या मागे फक्त तक्रारी असतात आणि आपण या तक्रारींशीच समस्या म्हणून झुंजत असतो.

नातेसंबंधांमध्ये येणारे बरेचसे ताणतणाव हे या तक्रारींची परिणिती असते. ‘हा असाच वागतो’, ‘ती मला समजूनच घेत नाही’ या आणि अशा अनेक तक्रारींचा पाढाच नेहमी वाचला जातो. पण एक गोष्ट आपण विसरतो की तक्रार हे एखाद्या व्यक्ती किंवा वस्तूबद्दल केलेलं एक नकारात्मक विधान ज्याचं उत्तर सापडणं बहुतेक वेळा कठीण असतं. पण याउलट समस्या हे खरं तर आपली आताची स्थिती आणि आपली इच्छित स्थिती यामधील अंतर असतं जे सांधण्याचे प्रयत्न नक्कीच केले जाऊ शकतात (Problem is the distance between current position and desired position). समस्या समजून घेण्याची योग्य अशी पद्धत आपल्याला बहुतेक वेळा माहीतच नसते. अशावेळी मग ‘व्यक्ती’ आणि ‘वर्तन’ यांना विवेकाने वेगवेगळे न ठेवता आपण समोरच्या व्यक्तीवरच ‘समस्या’ हा शिक्का मारतो. आणि मग एकदा का समोरची व्यक्ती हीच आपली समस्या झाली कि ती व्यक्ती बदलल्याशिवाय हा गुंता सुटूच शकत नाही असा न्यायनिवाडा आपण स्वतःच्या मनाच्या कोर्टात करून मोकळे होतो. आणि मग आपली समस्या सोडवण्यासाठी त्या व्यक्तीला बदलण्याचा चंग बांधला जातो. कधी कधी हा तात्पुरता बदल घडतोसुद्धा पण जरा काही बिनसलं की पुन्हा हि गाडी रुळावरून घसरते. आणि मग समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याला तिची समस्या समजू लागते. मग सुरु होतो एकमेकांवर दोषारोपण करण्याचा खेळ (blame game)! म्हणून तडकाफडकी उपचार करण्याआधी समस्येचे योग्य ते निदान होणे खूप गरजेचे आहे नाहीतर रोगापेक्षा इलाज भयंकर असे म्हणायची वेळ येऊ शकते!!

चला तर मग, यापुढे आपल्या कोणत्याही नात्यात निर्माण झालेली समस्या पूर्णपणे समजून घेऊ,फक्त एकमेकांवर दोषारोप न करता समंजसपणे व्यक्ती आणि वर्तन यांना वेगवेगळे ठेवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर त्या वर्तनामुळे आपल्याला नेमका काय आणि कसा त्रास होतो आहे, तो त्रास कमी करण्यासाठी दोघे मिळून काय करू शकतो ह्याचा नक्की विचार करता येईल. यामुळे अडचण अगदी चुटकीसरशी सुटली नाही तरी त्याकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन तरी नक्कीच मिळेल.

जर तुम्ही तुमच्यासोबत घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देणार असाल तर तुमचा त्रास कधीच कमी होणार नाही.

दलाई लामा


Leave a comment