
आपलं आयुष्य म्हणजे खरंतर एक प्रवासच असतो. या प्रवासादरम्यान अनेक बरे वाईट अनुभव आपल्याला येत असतात. आणि हे सगळे अनुभव गाठीशी बांधून आपण पुढे मार्गक्रमण करत असतो. या आयुष्य नावाच्या प्रवासात आपल्याला अनेक प्रकारची सोबत मिळते. कधी ती आपल्या आप्तस्वकीयांची असते तर कधी मित्रमंडळींची!! या आपल्या जीवलगांच्या सोबतीने आपला हा प्रवास सुखकर होत असतो. पण सध्याच्या धावपळीच्या जगात ही सोबत प्रत्येकाच्या वाट्याला येईलच असं नाही. आणि जसजसं आपलं वय वाढत जातं तशी आपल्या आप्तांची आणि मित्रांची साथ कधी कधी मिळत नाही. निवृत्तीनंतर तर ज्येष्ठ मंडळींकडे तसा मोकळा वेळही भरपूर असतो मग त्या वेळेचे योग्य प्रकारे नियोजन केलं तर त्यांचंही जीवन आनंदात जाऊ शकतं. हे नियोजन प्रत्यक्ष निवृत्तीच्या आधीच केलं तर हा बदल स्वीकारणं त्यांना सोपं जातं. या टप्प्यावर त्यांची साथ देऊ शकतात त्यांनी जोपासलेले छंद!
आपल्याकडे आजपर्यंत छंद हे फक्त लहानपणी निबंध लिहायला परीक्षेत येणारा एक विषय एवढ्याच दृष्टिकोनातून बघितले गेले आणि त्यांचं अस्तित्वही तेवढ्यापुरतच मर्यादित होतं. म्हणजे लहानपणी आपल्या जीवनाचा भाग असणारे चित्रकला, गायन, वचन हे छंद आपण मोठे होत असताना अभ्यास आणि नोकरी-व्यवसायाच्या धावपळीत कधी आपला हात सोडून निसटून जातात हे कळतसुद्धा नाही. अर्थात ते स्वाभाविकही असते म्हणा कारण त्यावेळी आपले प्राधान्यक्रम वेगळे असतात. पण तसे असले तरीही या सगळ्या राहटगाड्यातून थोडेसे मोकळे झाल्यावर पुन्हा या छंदांचा हात धरायला काय हरकत आहे??
छंदांचा मुख्य हेतु जरी आपला फावला वेळ घालवणे हा असला तरीही आपल्या छंदांच्या मदतीने इतर अनेक गोष्टी साध्य होतात जसे की काही छंद तुम्हाला शारीरिक स्वास्थ्य राखण्यात मदत करतात (उदा. धावणे, योगाभ्यास, ट्रेकिंग, नाचणे, इत्यादि) तर काही छंद तुमच्यातली सर्जनशीलता वाढवतात (उदा. चित्रकला, भरतकाम, ओरिगामि, नवनवीन व्यंजन बनविणे) काही छंदांमुळे तुमचे ज्ञानात भर पडते (उदा. वाचन, नवीन भाषा शिकणे, एखादे वाद्य शिकणे, लिखाण) तर कधी कधी आपले छंद आपली मानसिकता बदलविण्यास कारणीभूत ठरू शकतात (सामाजिक संस्थांसोबत काम करणे). आहे ना हे विलक्षण, म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर योग्य ते छंद जोपासले की आपल्यात कितीतरी बदल होऊ शकतो.
एवढेच नाही तर छंद आपल्याला इतर अनेक प्रकारे मदत करतात. आपल्या ताणतणावांच्या व्यवस्थापनात ते मोलाचे कार्य बजावतात. आपल्या दिनचर्येतला यांत्रिकपणा दूर करण्यात छंद मदत करतात. माणूस हा एक बौद्धिक प्राणी आहे त्यामुळे त्याला सतत नवनवीन आव्हाने आणि नवे अनुभव खुणावत असतात, छंद आपली ही गरज पूर्ण करू शकतात.
आपल्याकडे निवृत्तीनंतरच्या आयुष्याच्या नियोजनबद्दल खूप उदासीनता दिसून येते. काही अपवाद वगळता बरेच लोक त्याकडे केवळ आरामात घालवायचा काळ असेच बघतात. मग टीव्ही किंवा मोबाइल पाहत वेळ घालवणे आणि इतरांना आमच्यासाठी वेळ नाही अशी सतत तक्रार करत बसणे ह्यातच त्यांचं अख्खं आयुष्य निघून जातं. आराम करणं जरी गरजेचं असलं तरी जास्तीतजास्त प्रमाणात क्रियाशील राहिलं तरच आपलं शरीर आणि मन स्वस्थ राहतं हे सर्वज्ञात आहे. शिवाय इंग्रजी मध्ये एक म्हण आहे “Empty mind is Devil’ s Workshop.” म्हणजे रिकामे डोके सैतनाच घर! त्यानुसार आपण जर काहीच न करता शांत बसून राहिलो तर ही म्हण नक्कीच खरी होऊ शकते. म्हणूनच जो आपला छंद आहे त्यात मन गुंतवा, कधी कधी नवीन गोष्टी पण करून पहा. स्वतःला एखाद्या चौकटीत बंदिस्त करून घेऊ नका किंवा सतत आपल्या मर्यादांची उजळणी करत बसू नका. त्यापेक्षा कधी एखाद्या रोपट्याची काळजी घेऊन बघा, कधीच न केलेली एखादी पाककृती करून बघा, नवीन लोकांशी ओळख करून बघा, आजूबाजूच्या लहान मुलांना गोष्ट सांगून बघा, किंवा एखाद्या चित्रात आपल्या आवडीचे रंग भरून बघा आणि हे एकदाच करून थांबू नका तर सातत्याने करत रहा. छोट्याछोट्या गोष्टीत आनंद लपलेला असतो फक्त तो मनमुराद लुटता आला पाहिजे!!
लक्षात ठेवा,
आयुष्याला रिमोट नसतो, त्यामुळे उठा आणि तुमचं आयुष्य बदला!!
तुमचे आवडते छंद कोणते आणि अजून कोणते नवीन छंद जोपासयला तुम्हाला आवडतील ते कमेन्ट करून सांगा.
