
“मुलं कधीच त्यांच्या मोठ्याचं निमूटपणे ऐकण्यात चांगली नसतात, परंतु मोठ्यांचं अनुकरण करण्यात मात्र ती कधीच चुकत नाहीत!!” अमेरिकन लेखक आणि सामाजिक कार्यकर्ता जेम्स बाल्डविन यांनी या वाक्यात खरंतर पालकत्वाच्या प्रवासातले एक महत्वाचे पण दुर्लक्षिलेले सत्यचं विषद केले आहे!! दुर्लक्षित अशासाठी कारण, आपल्या लहानपणापासूनच आपल्यावर मोठयांनी ऐकण्याचे संस्कार केले असतात आणि कळत-नकळत सवयीने आपणसुद्धा पालक झाल्यावर हीच परंपरा पुढे नेतो. पण आजकालच्या पालकांना यातला फोलपणा जाणवायला लागला आहे कारण आताच्या या लहान मुलांवर जन्मापासूनच माहितीचा इतका भडिमार होत असतो की त्यांनी फक्त आपलंच ऐकावं हे खरंतर शक्यच नाहीये. त्यामुळे आता “पालकत्व” याविषयी खरंच काही गोष्टी जाणून घ्यायची गरज निर्माण झाली आहे. म्हणजे आपल्या मुलांच्या या अवाढव्य अशा जगात आपल्याला प्रवेश करता येईल आणि त्यांना गरज असेपर्यंत तिथे राहता येईल.
मानसशास्त्रामध्ये बालमानसशास्त्र या शाखेला अनन्यसाधारण महत्व आहे कारण शेवटी बालवयापासूनच आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण होत असते. अर्थातच या प्रवासात सर्वात मोठी भूमिका असते ती पालकांची!! म्हणून मुलाच्या व्यक्तिमत्वावर प्रभाव टाकणाऱ्या पालकत्वाच्या चार महत्वाच्या शैली आपण बघूया.
१. हुकुमशाही पालकत्व शैली (Authoritarian Parenting Style): नावाप्रमाणेच ही एक कठोर आणि नियमबद्ध पालकत्व शैली आहे. यात पालक आपल्या मुलांसाठी कठोर नियम आखून देतात आणि त्यांचा अट्टहास असतो की ते पाळले जायलाच हवेत नाहीतर मुलांना शिक्षा देणे क्रमप्राप्त आहे. अशा पालकांच्या आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात पण मुलांच्या मतांचा किंवा भावनांचा फारसा विचार केला जात नाही. हुकुमशाही पालकत्व शैली सारखी वापरल्यामुळे एकतर मुले आक्रमक किंवा कोडगी बनतात नाहीतर ती भित्री, लाजाळू असतात. त्यांच्यात आत्मविश्वासाची पण कमतरता असते.
२. मुक्ताचार पालकत्व शैली (Permissive Parenting Style): या शैलीचे पालन करणारे पालक मुळात प्रेमळ असतात आणि ते आपल्या मुलांना नकार देऊ शकत नाही किंवा दुखवू शकत नाही म्हणूनच ते मुलांच्या मुक्त वागण्यास नेहमी परवानगी देतात. ते मुलांसाठी फार कमी नियम घालतात आणि बरेचदा मुलांच्या चुका पोटात घालण्याकडे त्यांचा कल असतो. ते मुलांशी मित्रत्वाचे नाते जपतात पण त्यांच्या वागण्यात शिस्तीचा अभाव असतो ज्यामुळे मुलं काहीशी बेजबाबदार, बेफिकीर आणि अहंकारी बनू शकतात.
३. विश्वासार्ह पालकत्व शैली (Authoritative Parenting Style): ही शैली सर्वात परिणामकारक आणि प्रभावशाली मानली गेली आहे. यामध्ये पालक प्रेमळ, प्रतिसाद देणारे, आश्वासक तर असतातच पण ते त्यांच्या मुलांना शिस्तीसाठी योग्य ते नियम सुद्धा घालून देतात. विश्वासार्ह पालकत्व शैलीचा वापर करणारे पालक वेळोवेळी मुलांच्या चांगल्या वागण्याचे जसे कौतुक करतात तसेच मुलांच्या अयोग्य वागण्याबद्दल त्यांना योग्य शब्दात समज देखील देतात. एकूणच या शैलीमध्ये पालक आणि मुले यांच्यात मुक्त सुसंवाद असतो. अशा वातावरणात वाढलेली मुले आनंदी, निर्णय घेण्यास सक्षम, आत्मविश्वासू आणि आयुष्यात यशस्वी असतात.
४. निष्काळजी पालकत्व शैली (Neglectful/Uninvolved Parenting Style): ही पालकत्व शैली मुलांसाठी अत्यंत हानिकारक मानली जाते. निष्काळजी पालक आपल्या मुलांच्या संगोपनाच्या मूलभूत गरजा भागविण्यात असमर्थ असतात. मुलांना शिस्तीसाठी कुठलेही नियम हे पालक घालून देत नाहीत. बरेचदा असे पालक स्वतः मानसिक आरोग्यातील समस्यांनी ग्रस्त असतात किंवा व्यसनांच्या आहारी गेले असतात त्यामुळे ते मुलांना कोणत्याच प्रकारचा भावनिक आधार, मार्गदर्शन देऊ शकत नाही. या परिस्थितीत वाढलेली मुले विविध वर्तन समस्यांनी ग्रस्त, आत्मविश्वासाचा अभाव असलेली आणि निराश मनोवृत्तीची असतात.
आपण सर्वजण कमी अधिक प्रमाणात ह्यातील बऱ्याच गोष्टी करत असतो. कधी एखादी क्लूप्ती लागू पडते तर कधी सपशेल अपयशी ठरते. परंतु या सर्व पालकत्व शैलींबद्दल माहिती असेल तर आपल्याला सकारात्मक पालकत्वाची दिशा सापडू शकेल. अर्थात यासाठी सतत आणि प्रयत्नपूर्वक शिकत राहणे, माहितीला शास्त्रोक्त शहाणपणाची जोड देणे अनिवार्य आहे.
शेवटी, हे नक्कीच नमूद करावसं वाटतंय…
तुम्ही जसे आहात, तशी तुमची मुले बनणार आहेत, तेव्हा तुम्ही तसेच रहा जशी तुमची मुले असावीत असं तुम्हाला वाटतंय!!!
डेव्हिड ब्ले
